पिंपरी, (प्रतिनिधी) – पीसीसीओईचा माजी विद्यार्थी शुभम भगवान थिटे याने यूपीएससी परीक्षेत मिळविलेले उल्लेखनीय यश कौतुकास्पद आहे. त्याचा पीसीईटी व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो, असे पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी सांगितले.
पीसीसीओईचा २०१८ च्या मेकॅनिकल विभागाचा माजी विद्यार्थी शुभम थिटे याने नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. त्याचा सत्कार काळभोर यांच्या हस्ते ट्रस्ट कार्यालयात शुक्रवारी करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले,
खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी काळभोर म्हणाले की, पीसीईटीच्या सर्वच कॅम्पस मध्ये आधुनिक तंत्रज्ञान युक्त उच्च दर्जाच्या प्रयोगशाळांसह उच्च विद्या विभूषित प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास कार्य तत्पर आहेत. नेहमीच्या शैक्षणिक अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षा व तसेच इतर उच्च शिक्षणासाठीच्या परीक्षा तयारी देखील येथे करवून घेतली जाते.
यासाठी स्टडी सर्कल नावाने स्वतंत्र क्लब देखील बनविन्यात आला आहे. महाविद्यालयातून आत्तापर्यंत ३ माजी विद्यर्थ्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी एमपीएससी मध्ये यश मिळवले आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी व्यवस्थापन नेहमीच प्रोत्साहन देत असते.