निगडी – आकुर्डी-चिखली मार्गावर थरमॅक्स चौकाजवळ रहदारीच्या मार्गातील चेंबरचे झाकण गायब झाले आहे. त्यामुळे चेंबर उघडा असल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना येथून प्रवास करताना काळजी घ्यावी. तर महापालिकेच्या संबंधित विभागाने येथील चेंबरची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
आकुर्डी-चिखली मार्गावर दिवसरात्र वाहतूक सुरू असते. चिंचवड एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी आदी परिसरातील कंपनीत काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणावर चिखली, मोरेवस्ती, संभाजीनगर, शरदनगर, त्रिवेणीनगर, ताम्हाणे वस्ती आदी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांना कंपनीत तीन शिपमध्ये काम करावे लागते.
त्यांना दिवसा व रात्री प्रवास करताना हा धोकादायक चेंबर दिसून न आल्यास अपघाताची शक्यता आहे. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना देखील रस्त्याने प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने येथील चेंबरचे झाकण त्वरित बसवून मार्ग नागरिकांसाठी व वाहनचालकांसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.