लोणावळा, (वार्ताहर) – मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ, मावळ व काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा शहरात काव्य अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोणावळेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
महिला मंडळ हॉल, हुडको येथे हा कार्यक्रम झाला. लोणावळा आणि तळेगाव मधील 23 कवींनी राजकीय, सामाजिक यासारख्या विविध विषयांवर आपल्या कविता याठिकाणी सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली.
या वेळी लोणावळ्याच्या माजी उपनगराध्यक्षा सिंधुताई कवीश्वर, मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रा. जयंत जोर्गेकर, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण मुळे, सहसचिव भास्कर पुंडले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, वसंत व्याख्यानमाला समिती अध्यक्ष चित्रा जोशी, निवृत्त पोलीस निरीक्षक मोहन जाधव आदी उपस्थित होते.
लोणावळा शहरात काव्य अभिवाचनाचा हा पहिलाच कार्यक्रम होता. शिवसेना जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय काळोखे आदींनी या काव्य अभिवाचन कार्यक्रमाला भेट दिली. सूत्रसंचालन प्रशांत पुराणिक यांनी केले. आभार निखिल कवीश्वर यांनी मानले.