पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथक यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. गणेश मंडळांचा कार्यकर्ता संसदेत गेला पाहिजे, त्या माध्यमातून पुण्याच्या प्रश्नासमवेत गणेश मंडळांचे प्रश्न शासनदरबारी जातील आणि ते सुटतील अशी भावना मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांच्या पुढाकाराने प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांच्या मेळाव्याचे आयोजन शुभारंभ लॉन्स येथे करण्यात आले होते.
या मेळाव्याला उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासह सुनील रासने, महेश सूर्यवंशी, शैलेश टिळक, राहुल जाधव, नितीन पंडित, विकास पवार, सूर्यकांत पाठक, धीरज घाटे, निलेश वकील, संजीव जावळे, युवराज निंबाळकर, नवनाथ पठारे, हेमंत रासने, राजेंद्र अण्णा देशमुख, प्रवीण तरडे, अजय भोसले, आनंद सागरे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्याचे आयोजन केल्यानंतर मला अनेकांनी विचारले की, तुम्ही भाजपचे काम करता का, यावर मी कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यकर्ता नाही तर गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. मोहोळ हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते असून ते माझे मित्र आहेत. राजकीय सामाजिक असो अथवा कोविड, स्वाईन फ्लू अशा साथीचे आजार, मंडळाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरतो.
आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवायचे आहे. मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचतात. त्यामुळे येत्या दि. १३ मे या दिवशी कोणावरही दबाव न आणता जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन बालन यांनी मेळाव्यात केले.
सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि आयटी अशा सर्वच क्षेत्रात पुण्याचा देशभरात लौकिक आहे. हा लौकिक वाढवायचा असेल तर मंडळाचा कार्यकर्ता संसदेत पाहिजे. त्यासाठी आपल्याला मोहोळ यांना पाठिंबा द्यावा लागेल. ते संसदेत गेले तर निश्चितपणे मंडळाचे प्रश्न शासनदरबारी जातील, असे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे महेश सूर्यवंशी म्हणाले.
मंडळाचे जसे प्रश्न आहेत तसेच कोणत्याही शुभकार्याची सुरवात करणाऱ्या ढोल-ताशा पथकांचे देखील आहेत. या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपला खासदार हवा आहे, असे ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर म्हणाले. नितीन पंडीत यांनी प्रास्ताविक केले. मंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही भाषणे केली आणि मोहोळ यांना पाठिंबा दिला.