पिंपरी, (प्रतिनिधी) – अक्षय तृतीयेसाठी फळबाजारात कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यामुळे बाजारपेठेत आंब्यांचा बहर आला असून आवक वाढल्याने किरकोळ बाजारात आंबा दरात घट झाली आहे. तर, हापूस आंबा सहाशे ते नऊशे रुपये डझन दराने विकला जात आहे. तर, इतर जातीचे आंब्यांची प्रति किलो दराने विक्री होत असून २०० रुपये प्रतिकिलो दर आहे.
जानेवारीपासून आंबा बाजारपेठेत दाखल होत असला तरी बहुसंख्य नागरिक हे अक्षय तृतीयेला आंबा खाण्यास सुरवात करतात. जानेवारापासून चढे असलेले दर अक्षय तृतीयेला काहीसे आटोक्यात येत असतात. अक्षय तृतीया शुक्रवारी (दि. १०) आहे. अक्षय तृतीयेला पूर्वजांना आंब्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. नैवेद्य अर्पण केल्यानंतर आंबे किंवा आमरस खाण्यास सुरवात होते. त्यामुळे अक्षय तृतीयेपासून आंब्याला मोठी मागणी असते.
यंदाच्या हंगामात सततच्या हवामान बदलामुळे आंब्याच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे आंब्याच्या पहिला बहरात आंब्यांची आवक नेहमीच्या तुलनेत कमी प्रमाणावर झाली. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकणातून आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे आंब्यांच्या दरात काहीशी घट झाली आहे. ९०० रुपयांच्या पुढे असलेला आंबा आता सहाशे रुपये डझन मिळत आहे.
आवक मोठी
अक्षय तृतीयेसाठी फळबाजारात कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर झाली. आवक वाढल्याने किरकोळ बाजारात आंबा दरात घट झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार हापूस आंब्याचा एक डझनाचा दर सहाशे ते नऊशे रुपये असा आहे.
ग्राहकांकडून तयार आंब्यांना मोठी मागणी आहे. तसेच आवक वाढणार अक्षय तृतीयेसाठी बाजारातचांगल्या प्रतीच्या हापूसची आवक बाजारात दाखल होत आहे. यापुढील काळात आंब्यांची आवक वाढणार असून दरातही घट होण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
तयार आंब्यांना मागणी
अक्षय तृतीयेला आंब्याना असणारी मागणी विचारात घेऊन कोकणातील शेतकऱ्यांनी बाजारात पेटय़ा पाठविल्या होत्या. गेल्या दोन ते तीन दिवसांत बाजारात हापूसची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच शुक्रवारी (दि. १०) असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त तयार आंब्यांना मागणी आहे.
तसचे चार ते पाच डझनाच्या पेटीपेक्षा एक ते दोन डझनाला मागणी आहे. तसेच काहीजण परगावी आंबे पाठवत असल्याने दोन-तीन दिवसांनी तयार होतील अशा आंब्यांना मागणी आहे, असे आंब्याचे व्यापारी सांगतात.