पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या सोमवारी (दि. १३ मे) मतदान घेण्यात येणार आहे. मावळातील सहा विधानसभा मतदार संघात सुरक्षितरित्या मतदान पार पाडण्यासाठी सुमारे १२ हजार मतदार अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कामकाज पाहणार आहेत.
त्यासाठी लागणा-या मतदान यंत्रांची वाहतूक करण्यासाठी एका बोटीसह पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमल) १७५ बसेस, एसटी महामंडळाच्या २१९ बसेस, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनर एवढ्या वाहनांचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मावळ लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतूक आराखडा तयार केला आहे. अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन केले आहे. एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रावर एकूण ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत.
संवेदनशील केंद्रांवर ८३ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहेत. मतदानासाठी १ हजार ९५८ बॅलेट युनिट, ७५० कंट्रोल युनिट आणि ७८८ व्हीव्हीपॅट यंत्रांची आवश्यकता असून या यंत्रांची सरमिसळ करून विधानसभा निहाय त्यांचे वितरण करण्यात आले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मतदान यंत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.
मावळ मतदार संघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या संपूर्ण लोकसभा कार्यक्षेत्रात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात ३३ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता पिण्याचे पाणी, औषधे, मंडप उभारणी, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था आदी सुविधांसह इतर तांत्रिक बाबींचीही पुर्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मतदान केंद्र शोधण्याची संकेतस्थळावर सुविधा
मावळ लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदार केंद्रांची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर असलेले क्युआर कोड स्कॅन करून मतदार यादीत आपले नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचेही दीपक सिंगला यांनी सांगितले.