पिंपरी – महावितरण कंपनीचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांचे नातेवाईक ठेकेदार म्हणून पिंपरी चिंचवड भागात काम करत आहेत. त्यामुळे स्थानिक विद्युत ठेकेदारांना उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे. त्यामुळे अशा नियमबाह्य पद्धतीने सरकारी नोकरी करताना अप्रत्यक्ष खासगी व्यवसायात सहभागी असलेल्या सर्व कर्मचारी, अभियंते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पिंपरी चिंचवड इलक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने केली आहे.
महावितरणची कामे करताना सरकारी ठेकेदार असल्याचे लायसन्स असणे बंधनकारक आहे. त्यामुळे नवीन जोडण्या, टेंडर या सगळ्यांना लायसन्स ही आवश्यक अट आहे.महावितरण कर्मचारी आणि अभियंते यांच्या नातेवाइकांच्या नावे लायसन्स काढून ज्या भागात महावितरण कर्मचारी कामाला आहेत, त्या भागातील सगळी कामे नातेवाइकांना दिली जात आहेत. त्यामुळे शहरातील वास्तव्याला असलेल्या अनेक ठेकेदार आणि त्यांच्या व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावे लायसन्स असल्याची बाब अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयांना सांगूनही कारवाई होत नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
शासकीय नोकरी मिळवताना कुठलेही गैरकृत्य करणार नाही, असे हमीपत्र दिले असतानाही अनेक कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने या सगळ्या कामांमध्ये सहभागी आहेत, ही बाब असोसिएशनकडून निदर्शनास आणून दिलेली आहे. या सर्वांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने ऊर्जामंत्री यांच्याकडे निवेदनाने केली आहे.