कार्ला, (वार्ताहर) – श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील इयत्ता १० वी २००४-०५ च्या वर्षातील विद्यार्थी मित्र मैत्रिणी एकत्र येत २० वर्षांनी यांची शाळा भरली व जुन्या विद्यार्थांंच्या किलबिलाटाने पुन्हा शाळा गजबजली. ज्या शाळेत शिकले, मोठ्या पदावर विराजमान झाल्यानंतर पुन्हा त्याच शाळेच्या आठवणींनी या विद्यार्थ्यांनी उजाळा दिला.
श्री एकविरा विद्या मंदिरात २००४-०५ मध्ये इयत्ता दहावीमधील माजी विद्यार्थ्यांंचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या वेळी शाळेचे तत्कालीन प्राचार्य संजय वंजारे, माजी अध्यापक रामभाऊ पोटे, दशरथ ढमढेरे, विलास येवले, छाया मोरे, सुनिल बोरुडे, शहादेव जाधव, काकासाहेब भोरे, संतोष हुलावळे, उमेश इंगुळकर, मधुकर गुरव, बाबाजी हुलावळे या सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी एक दिवसीय शाळेची सुरुवात शाळेची घंटा वाजवून राष्ट्रगीत म्हणत झाली.
सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर या बॅचमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना देवाज्ञा झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उत्साही वातावरणात प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून दिली.
तर, शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. या एक दिवशीय शाळेची सांगता वृक्षारोपणाने करण्यात आली. सूत्रसंचालन राहुल गायखे, सुवर्णा भानुसघरे, कैलास हुलावळे, राखी शेलार यांनी केले.