खालापूर, (वार्ताहर) – मीळ गावाशेजारील डम्पिंग ग्राऊंडला सोमवारी (दि. ६ ) रात्रीच्या दरम्यान आग लागली होती. त्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. तर, आग दुसऱया दिवशीही धमसत होती. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे प्रयत्न केला. प्रशासनाकडून आग विझविण्यासाठी यंत्राणा उभी न केल्याने दुसऱ्या दिवशीही आग घुमसत होती. टाटा कंपनीचे अग्निशमन दलाचे जवानांनी मदत कार्य केल्यानंतर आग आटोक्यात आली.
मीळ डम्पिंग ग्राऊंडला रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याने, सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. या धुराने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आरोग्य विभागाचे अतुल घोडके यांनी आपल्या आधिकारी कर्मचारी यांच्यासोबत पोहचून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले असून आग संपूर्ण डम्पिंगवर पसरली आहे. आगीच्या धुराने हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. दुसरया दिवशी सकाळी टाटा कंपनीचे अग्निशमन दलाचे जवान, अपघातग्रस्त टिमने मदतकार्य केले. तर, अग्निशमन दलाचे चार पेक्षा जास्त बंब आग विझवीत आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी रात्रीपासून आग विझविण्याचे पराकाष्ठा करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दिली आहे.