पिंपरी, (प्रतिनिधी) – धरणातील पाणी पातळी घटत असताना पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वायाला जात आहे. दोन दिवसांपूर्वी दिघी येथे जलवाहिनी फुटून पाणी वाया गेले होते. तर बुधवारी (दि. 8) त्रिवेणीनगर चौकात मुख्य जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. त्यामुळे निगडी, यमुनानगर परिसरासह लगतच्या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
ऐन उन्हाळ्यात पाइपलाइन फुटण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी वितरित केले जाणारे पाणी वाया जात आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणातील पाणी पातळीत घट होत आहे. आधीच शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी दिले जाते.
त्यातच आज बुधवारी त्रिवेणीनगर चौकात सकाळी आठ वाजता मुख्य पाइपलाइन फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. त्यामुळे निगडी गावठाण, यमुनानगर, सेक्टर 22, पीसीएमसी कॉलनी, कृष्णानगर भागातील पाणी पुरवठा बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले होते.
या पाइपलाइनद्वारे निगडीतील यमुनानगर भागाला पाणीपुरवठा केला जातो. सकाळी पाणी सोडले जाते, दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण भागाला पाणीपुरवठा केला जातो. परंतु, पाइपलाइन फुटल्याने सकाळी आठ वाजता या भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
त्यामुळे यमुनानगरसह त्रिवेणीनगर, निगडी गावठाण, सेक्टर 22, पीसीएमसी कॉलनी, कृष्णानगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाण्याचा तबाव आल्याने पाइपलाइन फुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सकाळी आठ वाजताच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी सात वाजेपर्यंत काम पूर्ण होईल, त्यानंतर या भागाला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.