कराची – पाकिस्तानमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये देशातील अन्नसंकट गंभीर होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकीवरील लोकांचा एक गट वाहनाचा पाठलाग करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. नॅशनल इक्वॅलिटी पार्टी जेकेजीबीएलचे अध्यक्ष प्रोफेसर सज्जाद राजा यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना सांगितले की लोक गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत आहेत.
शेअर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, “ही मोटरसायकल रॅली नाही, पाकिस्तानातील लोक गव्हाचे पीठ घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत आहेत. हे लोक एका पिठाचे पोते मिळविण्यासाठी पाठलाग करत आहेत.’
ट्रक थांबताच दुचाकीस्वार नोटा हलवत ट्रकच्या दिशेने धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एका तरुणाला पिठाची पिशवी मिळवण्यात यश आले, त्यानंतर ट्रकला लगेचच इतर लोकांनी घेरले.
न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानला अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये गव्हाच्या पिठाची तीव्र टंचाई आहे. गेल्या आठवड्यापासून खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत. पिठाचे एक पॅकेट 3000 पाकिस्तानी रुपयांना विकले जात आहे.