पिंपरी – नवीन थेरगाव रुग्णालयातील क्ष-किरण विभागासाठी आवश्यक डिस्कॉम प्रणाली अंमलबजावणी, वाय.सी.एम रुग्णालयासाठी फ्लॅटबेड ए-3 स्कॅनर खरेदी आणि वायसीएममधीलच पदव्युत्तर संस्थेच्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी संलग्नकरणाचे नूतनीकरण व संलग्निकरणाचे विस्तारीकरणाच्या प्रस्ताव व शुल्काला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.
महापालिकेत बुधवारी (दि.17) स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 3 येथे विविध ठिकाणी महापालिका इमारतींची स्थापत्य विषयक कामांची दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास, पालिकेचे संतपीठ व विविध विभागास खुर्च्या व मल्टी सिटर बेंचेस खरेदी, प्रभाग क्रमांक 5 गवळी नगर, आदर्श नगर व इत्यादी ठिकाणी पेव्हिंग ब्लॉकची सुधारणा करण्यासह स्थापत्य विषयक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 10 मधील विविध रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करणे कामातील विद्युत विषयक कामे, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उद्यानात आवश्यकतेनुसार विद्युत विषयक कामे, पालिकेच्या विविध विभागांसाठी ए-3 साईज कलर प्रिंटर खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.