अमृतसर – वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख खालिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याने पंजाबच्या खडूर लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तो अपक्ष म्हणून रिंगणात उतरला आहे. अमृतपाल सध्या दिब्रुगढ येथील तुरूंगात आहे. त्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांची पॅरोल मागितली होती. त्यासाठी त्याने उच्च न्यायालयातही अर्ज केला होता.
एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठासमोर त्याचा अर्ज सुनावणीला आल्यावर पंजाबचे उप ॲडव्होकेट जनरल अर्जुन श्योराण यांनी न्यायालयाला सांगितले की दिब्रुगढ मध्यवर्ती कारागृहाच्या अधिक्षकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज आणि अन्य कागदोपत्री बाबींचे दोन सेट ९ मे रोजी कैद्याकडून भरण्यात आले आहेत. त्यावर स्वाक्षरीही करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी अमृतपालचे पिता तरनेम सिंग यांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या बातमीत असे म्हटले होते की अमृतपालची निवडणूक लढण्याची इच्छा नाही. मात्र त्याने निवडणूक लढावी असा निर्णय संघटनेने घेतला असेल तर तो आपला निर्णय बदलेल. अमृतपालला सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुरूंगात ठेवण्यात आले आहे.