मुंबई – शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महायुतीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. ही नोटीस वकिल असिम सरोदे यांच्या वतीने बजाविण्यात आली आहे. यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर रवींद्र वायकर हे ठाकरे गटात होते. पण महिनाभरापूर्वी त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर त्यांना शिंदे गटाकडून वायव्य मुंबईतून उमेदवारीही जाहीर करण्यात आली.
दरम्यान, रवींद्र वायकर हे आमदार आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला अपात्र का करु नये? अशी नोटीस ठाकरे गटाने रवींद्र वायकर यांना पाठवली आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनाही पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आता पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.