जादा दराने विक्री : मास्कला पॅकिंगही नाही, ग्राहकांची होतेयं फसवणूक
पिंपरी – देशात करोना रुग्णांची संख्या वाढताच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या चार दिवसांपासून “एन 95 मास्क’चा तुडवडा जाणवू लागला आहे. याचाच फायदा काही कंपन्या आणि औषधविक्रेत्यांनी घेतला आहे. मास्कचा काळाबाजार सुरू करून जादा दराने त्यांची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे स्टॅण्डर्ड कंपनीचे नाव सांगून पॅकिंग नसलेले मास्क नागरिकांच्या माथी मारले जात आहेत.
स्टॅण्डर्ड कंपनीच्या एका मास्कची किंमत 100 ते 120 रुपये असते. मात्र सुरक्षेचे कोणतेही निकष न पाळता कोणत्याही मास्कला “एन 95 मास्क’ नाव देऊन त्याची चढ्या दराने विक्री केली जात आहे. एन 95 नाव देऊन लोकल मास्क तब्बल 200 ते 250 रुपयांला विकले जात आहे. धक्कादायक म्हणजे हा मास्क पॅकेटबंद नाही. त्यावर कंपनीचे नाव, एमआरपी ही लिहलेले नाही. राज्यामध्ये अद्यापपर्यंत एकही करोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. पुणे शहरात दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. मात्र पिंपरी चिंचवड शहरात अद्याप संशयित रुग्णही आढळलेला नाही. यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे महापालिका वैद्यकिय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र सोशल मीडियावर करोनाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तसेच अनेक तर्कवितर्क लावून नागरिकांना घाबरवण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे.
यातच वातावरणातील बदलामुळे अनेक जण ताप, सर्दी व खोकल्याने त्रस्त आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून नागरिक तोंडाला मास्क लावून फिरत आहेत. मास्क खरेदी करणारांची संख्या वाढल्याने मास्कच्या विक्रीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत एन 95 मास्कचा तुडवडा शहरात जाणवू लागला आहे. प्रभात प्रतिनिधीने शहरातील नेहरुनगर, कासारवाडी. पिंपरी व चिंचवड या भागात काही औषध विक्रेत्यांकडे या मास्कची मागणी केली असता, काहीजणांनी स्टॉक संपला असल्याचे सांगितले. तर काहीजणांनी दुकानामध्ये असलेले बनावट मास्क एन 95 मास्क सांगून अव्वाच्या सव्वा किंमत सांगितली. नेहरुनगर येथील औषधविक्रेत्यांने साध्या मास्कची किमत 90 रुपये सांगितली.
तर एन 95 मास्क 270 रुपयाला असल्याचे सांगितले मात्र या मास्कवर कोठेही कंपनी अथवा एमआरपी लिहलेली आढळली नाही. तसेच कासारवाडी येथील एका मेडीकल दुकानदारांकडे मास्कची मागणी केली असता, त्यांनी एन 95 मास्क असल्याचे सांगत 150 रुपये किमत सांगितली. मात्र हे मास्क पॅकेटबंद नव्हते.
ग्राहकांशी खेळ
“एन 95 मास्क’चा प्रत्येक मास्क पॅकेटबंदच येतो. त्यावर बॅच नंबरसह किमत लिहलेली असते. हा मास्क पीएम 2.5 कणांपासून 90 ते 95 टक्के थ्री लेअर असतो. मात्र एन 95 चे नाव सांगून त्यांची विक्री केलेल्या मास्कवर केवळ एकच लेअर असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
प्रत्येकांने मास्क लावण्याची आवश्यकता नाही
आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करोना विषाणू हा रुग्णांपासून तीन फुटाच्या पुढे जात नाही. तरीही सर्दी व ताप असलेल्या रुग्णांपासून दूर राहयला हवे. स्वच्छतेडकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या विषाणूसाठी साध्या साबणाने हात धुतले तरी चालतात. दुसऱ्यांशी हस्तांदोलन करणे टाळावे, नाकाला किंवा तोंडाला वारंवार हात लावू नये, जो रुग्ण असेल त्याने व त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एन 95 मास्क वापरावा. प्रत्येकाने एन 95 मास्क वापरायची आवश्यकता नाही.
ज्याचा या रुग्णांशी जवळचा संबध येतो उदाहरणार्थ डॉक्टर व नर्स यांनी हा मास्क वापरायचा आहे. करोनाचा हा विषाणू सुमारे 450 ते 500 नॅनोमीटर एवढा आहे. एन 95 मास्क त्या विषाणुला अडवतो. त्यामुळे रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी हा मास्क वापरण्याची आवश्यकता असते अशी माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.