पारगाव, (वार्ताहर)- एखाद्या घरात डोके दुखत असताना मेडिकलमधून गोळी घेताना गोळीचे नाव सुद्धा सांगता न येणाऱ्या एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात काही वर्षांपूर्वी एक स्वप्न चिंतले गेले. ते स्वप्न नयन उद्धव ताकवणे हिने सत्यात उतरले आहे. शेतकरी कुटुंबातील नयन हिने प्रतिकूलतेवर मात करीत एमबीबीएसचे शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने कुटुंबाचे पांग फेडले आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव येथील सर्वसाधारण एका ताकवणे कुटुंबातील रामदास, उद्धव व रवींद्र ताकवणे, असे तीन भावांचे शेतकरी कुटुंब. वडिलोपार्जित शेती करून उदरनिर्वाह करणे हाच व्यवसाय आहे. तिन्ही भावंडांचे वडील स्व. नारायण ताकवणे यांनी सालगड्याची कामे केली. राहण्यास चंद्रमौळी छप्पर, त्यातच लहानाचे मोठे होत असताना या तिन्ही भावंडांनी परिस्थितीची लाज न बाळगता वेळ पडेल ती कामे केली.
तिन्ही भावंडांत थोरले रामदास ताकवणे यांनी ओळखले की, भविष्यात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. कुटुंबातील पाच मुली व तीन मुलांना चांगले शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातील रामदास यांचे लहान बंधू उद्धव यांची मुलगी नयन ही अभ्यासात हुशार असल्याने कितीही कष्ट पडले तरी तिला डॉक्टर बनवायचे, हा निश्चय केला.
पारगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावी पर्यंत शिक्षण करून पुढील अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी बारामती येथील शारदानगर शैक्षणिक संकुल येथे पाठविण्यात आले. ” नयन तुला डॉक्टर व्हायचंय ” हे चुलते रामदास यांचे स्वप्न तिला पूर्ण करावयाचे होते. याच ठिकाणी नयन हिने रात्रंदिवस नीटच्या परीक्षेचा अभ्यास केला.
बारावीमध्ये तिला अपेक्षेपेक्षा जरा कमी गुण मिळाले. परंतु चुलते रामदास यांनी हार मानली नाही. पैशांची जमवाजमव करून नयन हिस एक वर्ष नीटच्या अभ्यासक्रमाचा पिंपरी चिंचवड येथील आकाश क्लासमध्ये प्रवेश घेतला. नयन हिने कुटुंबाचे स्वप्न सत्यात उतरविले. नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवून अहमदनगर येथील डॉ. पद्मश्री डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.
साडेचार वर्षानंतर एमबीबीएस ही परीक्षा मेरिटमध्ये पास होऊन एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करून नयन ही ताकवणे कुटुंबात पहिली डॉक्टर झाली. नयन हिचे आई वडिलांनी अहमदनगर येथे डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मुलीला सन्मानित होत असताना पाहताना नयन हिचे आई वडील उपस्थित होते. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.
चुलत्याचे स्फूर्तिदायक शब्द
मेडिकलसाठी प्रवेश घ्यायचा पण तो खर्च आपल्या कुटुंबाला झेपेल का, अशी चिंता नयन हिला पडायची. यावर चुलते रामदास यांचे स्फूर्तिदायक शब्द असायचे की” तू फक्त आजी- आजोबा यांना एक इंजेक्शन दिले तरी आमचे पैसे फिटले. ही ऊर्जा नयन हिला डॉक्टर होण्यासाठी फार उपयोगी पडली.