पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल : अहवालची प्रतिक्षा
बेल्हे (प्रतिनिधी) – आळेफाटा (ता.जुन्नर) येथे रहिवासी असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास होऊ लागल्याने संशयित करोना रुग्ण म्हणून पुणे येथील नायडू रुग्णालयात शनिवारी (दि. 9)दाखल केले असून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित आहे की नाही हे समजेल, व त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल मात्र, तोपर्यंत दक्षता घेण्यात येत आहे, अशी माहिती तलाठी आर. सी. वामन यांनी रविवारी (दि. 10) दिली.
बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुणे नायडू रुग्णालयात बदली झाल्यानंतर तेथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या आळेफाटा येथे असले ल्या निवासस्थानी चार दिवसांपूर्वी आले होते. त्यांना आळेफाटा येथे सर्दी, खोकलाचा त्रास होऊ लागल्यानंतर आळेफाटा येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तेथील लॅब व सोनोग्राफी सेंटरमध्ये त्यांच्या तपासणी करण्यात आली. पण त्रास कमी होत नसल्याने त्यांना आळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काही तपासणी करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील नायडू रुग्णालयात संशयित करोना रुग्ण म्हणून तपासणीसाठी हलविण्यात आले. त्या रुग्णाचा तपासणी अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त होईल, त्यांनतर करोना बाधित आहे की नाही हे स्पष्ट होईल, असे तलाठी वामन यांनी सांगितले.
दरम्यान, दक्षता म्हणून आळेफाटा येथील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचे निवासस्थान, आळे प्राथमिक आरोग्य केंद्र, एक खासगी सोनोग्राफी सेंटर आणि खासगी रुग्णालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“जर वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळे, बेल्हे, राजुरी, अणे गावांसह परिसराल्या वाड्या-वस्त्यांना बफर झोन घोषित करण्यात येईल, त्याची तयारी करण्यात आली असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
– टी. वाय. मुजावर, निरीक्षक, आळेफाटा पोलीस ठाणे