पुणे : तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्रणव सुर्वे ( २१, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शाळकरी मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुलगी दहावीत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी प्रणव शाळकरी मुलीचा पाठलाग करत होता. मुलीला अडवून तिला त्रास देत होता. तिच्या शाळेच्या आवारात जाऊन तो तिला धमकावत होता.
तीन दिवसांपूर्वी मुलगी शेतातून निघाली होती. त्यावेळी प्रणवने तिला अडवून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. प्रणवच्या त्रासामुळे मुलगी घाबरली होती. शुक्रवारी (१२ एप्रिल) तिने राहत्या घरात किटकननाशक प्याले.
मुलगी अत्यवस्थ झाल्याने तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांनी चौकशी केली. तेव्हा तिने आरोपी प्रणवच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.
विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत