- आई-वडील, भावानेच कट करुन संपविले
पिंपरी – आई, वडील आणि भावानेच कट करुन एका तरुणाचा खून करुन आत्महत्या असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई, वडील आणि भावाने खून करुन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. त्यांचा हा देखावा पोलिसांसमोर टिकला नाही. अखेर तिघांनीही नियोजनबद्धपणे केलेल्या खूनाची कबुली दिली. ही घटना शनिवारी दुपारी रहाटणी येथे घडली.
विजय रामदास वखरे (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश रामदास वखरे (वय 30), रामदास श्रीधर वखरे (वय 50) आणि चंचल रामदास वखरे (वय 46, सर्व रा. भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय याचे आपल्या पत्नीसोबत भांडण सुरू होते. त्यावेळी त्यांचा भाऊ गणेश वडील रामदास याने या भांडणात मध्यस्थी केली. त्यावेळी चिडलेल्या विजय याने वडीलांना चावा घेत भाऊ गणेश याच्यावर चाकूने वार केले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
विजय याला दारूचे व्यसन असल्याने तो घरातील सर्वांना वारंवार त्रास देत होता. त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्याचे नियोजन आई चंचला, वडील रामदास आणि भाऊ गणेश याने केले. मात्र विजय याची पत्नी यास विरोध करण्याची शक्यता होती. त्रास देणाऱ्या विजयचे हातपाय गणेश याने बांधले. विजय याच्या पत्नीला घेऊन भाऊ गणेश हा पोलीस ठाण्यात आला. तोपर्यंत त्याच्या आई वडीलांनी विजय याचा दोरीने गळा आवळून त्याचा खून केला.
आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव आई वडीलांनी केला. मात्र कोणीही स्वत:चा गळा आवळून आत्महत्या करू शकत नसल्याने पोलिसांना याबाबत शंका आली. त्यांनी आई, वडील, भाऊ यांच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता त्या तिघांनीही वेगवेगळी उत्तरे दिली. पोलिसांच्या प्रश्नांपुढे ते अधिक काळ टिकाव धरु शकले नाहीत आणि त्या तिघांनीही खूनाची कबुली दिली. मातृदिनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.