मुंबई : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला. रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी राजयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून आज पदभार स्वीकारला. रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन, अशी प्रतिज्ञा रमेश बैस यांनी घेतली. भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.
रमेश बैस यांचा जन्म जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता ते रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. रमेश बैस यांची जुलै 2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याआधी जुलै 2019 ते 2021 पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले होते तेव्हा त्यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.