Rupali chakankar । Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी ९३ जागांवर मतदान होणार आहे. या कालावधीत १७ कोटी २४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यादरम्यान महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रातील निम्म्या जागांवरील (२४) मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल.
तिसऱ्या टप्प्यात बारामती, सातारा, माढा, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्या जागांसाठी एकूण २५८ उमेदवार रिंगणात आहेत.
या दरम्यान ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या अडचणीत सापडल्या आहेत. चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनची पूजा केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर यांचा फोटो राज्यभर एकदम व्हायरल झाला. त्यावरुन समाज माध्यमावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. हा संपूर्ण प्रकार पाहून मतदान केंद्रावरील अधिकारी पण चक्रावले होते.