Volodymyr Zelenskyy – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांच्या हत्येचा कट केल्याबद्दल युक्रेनमधीलच दोन सुरक्षा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. रशियाशी संगनमत करून केलेल्या कटामध्ये हे दोन्ही अधिकारी सहभागी झाले होते, असे युक्रेनच्या प्रशासनाने म्हटले आहे.
अध्यक्ष झेलेन्सकी यांच्याशिवाय युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही हत्या करण्याचा कट केला गेला होता, अशी माहिती मिळाली आहे. या संदर्भात युक्रेनच्या सरकारी सुरक्षा सेवा विभागाने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
अटक करण्यात आलेले दोघेही अधिकारी युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षा देणाऱ्या स्टेट गार्ड ऑफ युक्रेनमधील कर्नल श्रेणीचे अधिकारी आहेत.
रशियाच्या फेडरल सिक्युरीटी सर्व्हिसने आखलेल्या कटाची अंमलबजावणी करण्याच्या संशयावरून त्यांना अटक केली गेली. रशियाने २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वीच या दोघांना भरती केले गेले होते.
झेलेन्सकी रशियासाठी वॉन्टेड
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांचे नाव रशियाने वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीमध्ये प्रसिद्ध केले आहे. रशियाच्या गृहमंत्रालयाच्या हवाल्याने सरकारी वृत्तसंस्थेने ही माहीती दिली आहे.
झेलेन्स्की आणि त्यांच्या पूर्वीचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को या दोघांनाही मंत्रालयाच्या अनिश्चित गुन्हेगारी आरोपांनुसार वॉन्टेड असलेल्या लोकांच्या यादीत स्थान टाकण्यात आले आहे.
झेलेन्स्की आणि पोरोशेन्को यांच्यावर कोणते आरोप आहेत, हे रशियन अधिकाऱ्यांनी त्वरित स्पष्ट केले नाही. पण या दोघांना काही महिन्यांपूर्वीच वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत टाकण्यात आल्याचे एका अन्य वृत्तसंस्थेने म्हटले आहे.