नेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये

नीलकंठ मोहिते
इंदापुरातील कॉंग्रेस भवनात कार्यकर्त्यांकडून शंकरराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

रेडा – कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, इंदापूर शहरातील कॉंग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालय असलेल्या कॉंग्रेस भवनमध्ये पाटील समर्थकांची वर्दळ आजही सुरू आहे. शुक्रवार (दि. 13) कर्मवीर शंकरराव बाजीराव पाटील यांची 13वी पुण्यतिथी होती. यावेळी कॉंग्रेस भवन कार्यालयात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रथेप्रमाणे त्यांना अभिवादन केले. त्यामुळे शहरात आणि तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु पाटील यांच्या नावाचा ठळक बोर्ड भवनासमोर झळकत आहे. त्यांच्या छबी देखील तशाच आहेत.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. परंतु इंदापूर तालुक्‍यातील एकाही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यालयात अजूनही कॉंग्रेस कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू आहे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस भवन नेहमीच कार्यकर्ते, नागरिकांच्या अडीअडचणीसंदर्भात वरदान मानले जात होते. आता इंदापूरच्या कॉंग्रेस कार्यालयाला कुलूप लागणार काय, अशी चर्चा तालुकाभर होती.

मात्र, पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी कॉंग्रेसचे कार्यालय दिवसभर उघडे असते. कार्यालयात कर्मयोगी शंकरराव पाटील यांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते ये-जा करीत आहेत. कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले नसल्यामुळे आजही कॉंग्रेसचे मातब्बर पदाधिकारी कॉंग्रेस भवनमध्ये वावरत आहेत. काही मोजक्‍या कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता आम्ही अजूनही कॉंग्रेस सोडली नाही, अशा प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

वरिष्ठांचे आदेश अजून आले नाहीत

इंदापूर शहरातील कॉंग्रेस भवन सुरू आहे. याचा अर्थ कॉंग्रेस पदाधिकारी कॉंग्रेसमध्येच आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी अजून कॉंग्रेसमध्येच राहावे, यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत. जर वरिष्ठांचे आदेश आम्हा कार्यकर्त्यांकडे आले तर आम्ही इंदापूर शहरातील कॉंग्रेस भवन ताब्यात घेऊ, अशी माहिती इंदापूर तालुका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)