खेड घाटातील इंदिरा तलाव शंभर टक्‍के भरला

पेठ परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली : पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज 

पेठ – येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेला पाणी पुरविणारा खेड घाटातील इंदिरा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे पेठ गावाचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. जानेवारी ते जून दरम्यान इंदिरा पाझर तलाव आटला होता. त्यामुळे पेठ गावात पाण्याची समस्या गंभीर बनली होती.

सर्वत्र टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने इंदिरा पाझर तलाव भरला आहे. या पाण्याचे चांगले नियोजन केले तर पुढील पावसाळा येईपर्यंत परिसरातील गावांची पाण्याची समस्या सुटणार आहे. मागील वर्षी खासगी टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागले होते. सातगाव पठार भागात वेळ नदीवर 9 केटीवेअर आहेत. ते सर्व पावसाळ्यात भरतात पण डिसेंबरमध्ये नदी कोरडी पडते. येथील सातही गावांमध्ये वेळ नदीवर पाणीपुरवठा नळ योजना होऊ शकत नाही. वेळ नदीतील सर्व पाणी वाहून जाते.

नदी खोलीकरण ही अनेकदा केले होते. पण नैसर्गिक भौगोलिक असमतोल असल्याने व हा भाग उंचावर असल्याने पावसाचे वाहून आलेले पाणी केटीवेअरमध्ये टिकून राहत नाही. यामुळे सातगावांपैकी पेठ गावाला खेड घाटातील इंदिरा पाझर तलावातून पिण्याचे पाणी आणले जाते. तर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना सार्वजनिक शेततळे करून थुगाव गावाने सुरू केली आहे. पेठ गावची लोकसंख्येने जास्त असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अनेक वर्षांपासून खेड घाटातील इंदिरा पाझर तलावातून पाणी आणले जात आहे. या वर्षी पाझर तलाव भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.