दहा दिवसांत शहरात 16 हजार 437 रुग्णांची भर
पुणे – शहरात दहा दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला. या दिवसांत नवीन 16 हजार 437 रुग्णांची भर पडल्याने शहरातील सक्रिय बाधितांची टक्केवारी 39 टक्केवर गेली आहे. 14 जुलैला एकूण रुग्णांच्या तुलनेत हा सक्रिय बाधितांचा आकडा 32 टक्के होता.
या कालावधीत महापालिकेने दैनंदिन चाचण्यांचे प्रमाणही सुमारे अडीच ते तीन हजारांनी वाढले होते. शहरात जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आले, तर 18 जून पासून जवळपास 90 टक्के व्यवसाय तसेच खासगी अस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. त्यामुळे वर्दळ वाढली, याचा परिणाम जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दिसून आला.
10 जुलैला झालेल्या पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत शहरात पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत पहिले पाच दिवस कडक लॉकडाऊन तर त्यांनतर 5 दिवस त्यात शिथितला देण्यात आली. त्यानंतर 24 जुलैपासून शहरात पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊनचे नियम सुरू आहेत. मात्र, या कालावधीत शहरात नव्याने 16 हजार 437 रुग्णांची भर पडली आहे.