पुणे – महापालिकेकडून एकीकडे तब्बल हजार कोटी रुपयांचा चुराडा करून नदीकाठ विकसन सुरू आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला विठ्ठलवाडी ते वारजे नदीकाठच्या परिसरात रातोरात शेकडो टन राडारोडा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी परिसरात शुक्रवारी रात्री दहा ते बार ट्रक पाडलेल्या बांधकामाचा राडारोडा नदीपात्राच्या कडेला आणि पात्रात टाकण्यात आला आहे.
विशेष म्हणजे नदीपात्रात टाकण्यात येणारा राडारोडा रोखण्यासाठी महापालिकेकडून पथके नेमण्यात आली होती, तसेच आरोग्य निरीक्षकांनाही त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने हे प्रकार सुरू असल्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणी कारवाईची जबाबदारी असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
आरोग्य कोठीशेजारीच प्रकार
सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल मंदिराच्या शेजारी नदीपात्रातून जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी महापालिकेकडून हिंगणे चौक ते विठ्ठलवाडी मंदिर कमानीपर्यंत लूप रस्ता विकसित केला जाणार आहे. या रस्त्यावर रातोरात आठ ते दहा ट्रक राडारोडा टाकण्यात आला आहे.
जुन्या पाडलेला बांधकामाचा हा राडारोडा आहे. विशेष म्हणजे या ठिकाणीच महापालिकेची आरोग्य कोठी असून, दिवसभर या कोठीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा वावर असतो. असे असतानाही मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून रस्ता अडविण्यात आला आहे.
कारवाईसाठी मिळेना वेळ
महापालिकेकडून शहरात निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी वाघोली येथील दगडखाणीत प्रक्रिया प्रकल्प उभारला असून, बांधकाम व्यावसायिकांनी नवीन बांधकाम करताना अथवा पुनर्विकासाचे काम करताना राडारोडा पालिकेच्या प्रकल्पातच देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी हा राडारोडा वाहून नेण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
मात्र, त्यानंतरही अनेक जण पैसे वाचविण्यासाठी राडारोडा टेकड्या, निर्जन रस्ते, तसेच नदीपात्राच्या कडेला टाकत आहेत. अशा प्रकारे राडारोडा टाकल्यास प्रतिवाहन २५ हजार रुपये दंड, तसेच राडारोडा उचलण्याचा खर्च वसूल करणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेकडून काहीच कारवाई होत नसल्याने हे प्रकार राजरोसपणे सुरूच आहेत.