पुणे – दृष्टी नाही, मात्र हिमालयात पडणारा बर्फ, थंडीचा अनुभव घेत मुलांनी हिमालय सफरीचा आनंद घेतला. यावेळी बर्फातील ट्रेक तेथील जीवनपद्धती, संस्कृती आणि मनाली येथे ११ हजार फूट उंचीवरील खोक्सर या ठिकाणी हिमाचा आनंद घेऊन अंध मुलांची टीम पुण्यात सुखरूप आली.
पुण्यातील स्वरुपसेवा, गिर्यारोहण संस्था गिरिप्रेमी आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ममता अंध अनाथ कल्याण केंद्र या संस्थेतील २२ अंध विद्यार्थ्यांची एक अनोखी हिमालय सफर झाली. सात दिवसांच्या हिमालय सफरीनंतर संघ सुखरूप परतला. या सर्व अंध विद्यार्थ्यांनी हिमालयातील हिमाचा अनुभव घेतला.
यावेळी श्रीकांत या अंध तरुणाच्या साहसी जीवनावर आधारित चित्रपट ऐकला. टिल्ला शारनी येथील ट्रेक पूर्ण केला, त्यावेळी हिमालयातील वेगाने बदलणाऱ्या हवामानाचाही अनुभवही घेतला. तेथील नागरिकांनी गप्पा, जीवन पद्धती, संस्कृती, राहण्याच्या व खाण्याच्या पद्धती जाणून घेतल्या.
एव्हरेस्ट शीखरवीर भुषण हर्षे आणि कॅम्प साईटचे संचालक चंदन शर्मा यांनी मुलांशी संवाद साधला. मनाली जवळील अटल बोगदा पार करून ११ हजार फूट उंचीवरील खोक्सर या ठिकाणी हिमाचा आनंद लुटला. बियास नदीच्या काठावर नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडांमध्ये अंघोळी केल्या.
या सफरीचे नियोजन सुयश मोकाशी, ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, अजित पटेल यांनी केले. यासाठी पीयूष शाह, तुषार कांबळे, कौस्तुभ ठकार, शेखर चंद्रचुड, अजित ताटे, कौशल पोहेकर, शशिकांत सोमण, अतुल मुरमुरे, रेखा जोशी, गिरिराज समेळ, जयसिंह देशमुख, शंकर ठाकुर, केतन पवार, ओंकार लेले, आकाश भालिया, निखिल कुचेकर यांचे सहकार्य मिळाले.