पुणे – शहरातील अनेक अवैध गोष्टींकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने, सुरक्षितता आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित सर्वत्र कडक कारवाई करून कायदा, सुव्यवस्था राखावी, अशी मागणी खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असता, ब्लॅक पबच्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळण्यात आले? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना त्वरित शासन व्हावे. शहरात अनधिकृत पब, बार, रूफ टॉप हॉटेल्सची अवैध बांधकामे, रात्री उशिरापर्यंत चालणारी हॉटेल्स, स्नॅक सेंटर्स, खाद्यपदार्थांचे अनधिकृत स्टॉल्स याचा समावेश आहे.
कल्याणीनगर येथे घडलेली घटना सामाजिक स्वास्थ्य बिघडवते. मात्र, या अनधिकृत गोष्टींवर कारवाई करण्यात पोलीस कुचकामी ठरले आहेत. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुण्यात एकूण अधिकृत पब, बार किती? अनधिकृत आणि अनियमित किती? याची माहिती मिळावी आणि कारवाईचे वेळापत्रक द्यावे, असे डाॅ. कुलकर्णी यांनी निवेदनात म्हटले आहे.
कायस्वरूपी कारवाई व्हावी
प्रभात रोड, नळ स्टॉप चौक येथील नाइट लाइफ आणि रस्त्यावर पहाटे सहा वाजेपर्यंत चालणारी खाद्यपदार्थांची विक्री यावर नागरिकांनी यापूर्वीच आवाज उठवला आहे. रहिवासी क्षेत्रात बार आणि पब असू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. असे असूनही रामबाग कॉलनी, बाणेर- बालेवाडी अशा सर्व ठिकाणी रूफ टॉप हॉटेल्स, बार आहेत. त्यांच्यावर तात्पुरती आणि दिखाव्याची कारवाई होते.
रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुले गाड्यांचे मोठे आवाज करत जोरात वाहने चालवतात. सोसायटी परिसरात कारमधील स्पीकरचा आवाज मोठ्याने लावतात. त्यावर कायस्वरूपी कारवाई व्हावी, अशी मागणी डाॅ. कुलकर्णी यांनी केली.