पुणे – केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दोन दिवसांत १४ हजार ५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य टप्पे जाहीर केले आहेत. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. प्रवेशासाठी पोर्टल सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग १ भरून अर्ज प्रमाणित करून घेण्यासाठी २४ मे पासून सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पुणे विभागातील प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी ३३३ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. मात्र, अद्याप पोर्टल प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या नाहीत. प्रक्रिया पूर्ण होताच प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात येणार आहेत. प्रवेशांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या ५ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग १ भरून लॉक केला आहे. त्यातील २ हजार ६१९ अर्जांची ऑनलाइन पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. मार्गदर्शन केंद्राद्वारे ७८१ अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे.
दरम्यान, इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.२७) जाहीर होत असून, त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग २ भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल. नियमित प्रवेश फेरीबाबत स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.