पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आराेपी मुलाचे वडील व आजाेबा यांनी दाेन दिवस कारचालक गंगाधर हेरीक्रुब यास डांबून ठेवले होते. त्याच्या पत्नीने त्याची सुटका केल्यावर तो मोठ्या मानसिक दबावाखाली होता. पोलिसांना याची माहिती समजल्यावर त्याचा येरवडा पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आला, अशी माहिती पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली
अमितेश कुमार म्हणाले, पुणे पाेलिसांनी याबाबत सदर अग्रवालच्या घरी छापा टाकून घटनास्थळी पंचनामा केला आहे. त्याला बंगल्यातील काेणत्या खाेलीत डांबून ठेवण्यात आले, अपहरण करण्यासाठी काेणती गाडी वापरली, चालकाने कंपनीचे जे कपडे घातले हाेते, ते बंगल्यात साेडले हाेते, त्याची तपासणी करायची आहे. चालकाने पाेलिसांना सांगितले की, त्याने घटना दिवशी कार चालवली नाही.
मात्र, त्याच्यावर दबाव टाकून त्यास जबरदस्ती केल्याने त्यास मानसिक धक्का बसला आहे. त्याला काेणत्या प्रकारची मारहाण करण्यात आली आहे का? याबाबत अद्याप त्याने काही सांगितले नाही. कारमध्ये जी दाेन मुले हाेती, त्यांच्या संर्पकात पाेलीस असून, ती अल्पवयीन असल्याने पाेलीस ठाण्यात बाेलवता येत नाही. मात्र, त्यांच्या घरी जाऊन चाैकशी करण्यात येत आहे.
कारचालक बदलण्याचा प्रयत्न केल्याची वस्तुस्थिती पाेलिसांसमाेर आली आहे. तपासाला आता गती आली असून, सर्व दिशेने याबाबतची चाैकशी करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कारमध्ये नेमके किती जण हाेते, याचीही चाैकशी करण्यात येत आहे.
अपहरण करून बंगल्यात डांबून ठेवले
हेरीक्रुब यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे, की येरवडा पोलिस स्टेशन येथून मी माझ्या घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल सरांनी मला येरवडा पोलिस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर बोलावून घेतले. मला धमकी देऊन माझ्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडील बीएमडब्ल्यू गाडीत बसवून ब्रह्मा सनसिटी येथील त्यांच्या बंगल्यात नेले.
तेथे सुरेंद्र अग्रवाल व विशाल अग्रवाल यांनी आपापसांत संगनमत करून मला धमकावले व माझा मोबाइल फोन काढून घेतला. त्यांच्या बंगल्यामध्ये डांबून ठेवले. त्यानंतर धमकावले, की त्यांच्या मुलाने केलेला गुन्हा स्वतः वर घे व त्याबाबत कोणाशी बोललास, तर याद राख.
पत्नीने गोंधळ घातल्याने केली सुटका
हेरीक्रुब घरी न आल्याने त्यांची पत्नी अग्रवाल यांच्या बंगल्यावर गेली. तेथे सुरुवातीला तिला दाद दिली नाही. मात्र, तिने आरडाओरडा करत गोंधळ घातल्यावर हेरीक्रुबला तिच्यासमोर आणण्यात आले. त्यानंतर तिलाही पैशांचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, तिने ते धुडकावून लावल्यावर हेरीक्रुबला तिच्यासोबत सोडण्यात आले. जाताना दोघांनाही कोणाशी काहीही न बोलण्याची धमकी देण्यात आली.
पोलिसांकडून चालकाला सुरक्षा
अग्रवाल कुटुंबीयांचा चालक गंगाधर हेरीक्रुब याला असलेल्या सुरक्षेचा धोका लक्षात घेता पुणे पोलिसांनी चालकाला सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे. इंडियन एव्हिडन्स ऍक्टनुसार चालकाला सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
सीन रिक्रिएशन सुरू
घटनेच्या दिवशी नेमके काय घडले होते. अल्पवयीन आरोपी घराच्या बाहेर कधी पडला, कुठे- कुठे गेला, त्याने काय केले, त्याला कोण- कोण भेटले, या सगळ्या घटनेचे सीन रिक्रिएशन करण्याचे काम सुरू आहे.