मालेगाव – राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पण याच दरम्यान मालेगावातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोना हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावात एकाच दिवसात तब्बल 51 रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत एकूण 428 रुग्ण करोनामुक्त झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
करोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण करोनामुक्त होत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासोबत मालेगावातील 93 अहवाल आले असून यातील 90 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 3 अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. मालेगावात आतापर्यंत एकूण 605 करोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 33 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिकमधील येवल्यातही आता करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरात आज दिवसभरात तीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर कुंभारवाडा, सिद्धेश्वर नगर, गोसाविवाडी परिसर 14 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत 700 पेक्षा अधिकांना करोनाची लागण झाली आहे.