मुंबई – राज्यात करोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात आज (16 मे) एका दिवसात तब्बल 79 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर मुंबईत आणखी एका पोलिसाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत करोनामुळे 11 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 153 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे.
धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचा-यास सर्दी आणि खोकल्या झाल्याने त्यांना लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता बुधवारी त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यत 8 करोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिक, पुणे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका पोलिसाचा बळी गेला आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. मात्र, त्यांनादेखील आता करोनाची लागण होत आहे. गेल्या तीन दिवसांत 196 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. आज (16 मे) एका दिवसात 79 पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. तर काल एका दिवसांत 60 पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार 153 वर पोहोचला आहे. यात 127 अधिकारी आणि 1026 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.