बहुतांश उमेदवार आज अर्ज दाखल करणार : जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी
अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांकडे पुणेकरांचे लक्ष
पुणे – बहुतांश उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारचा मुहूर्त निवडला आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मनसे उमेदवार यांच्यासह अपक्ष आणि अन्य पक्षाचे उमेदवार गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या बहुतांश जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. अर्ज दाखल करण्याला दोनच दिवस शिल्लक असल्याने बहुतेक उमेदवारांनी गुरुवारचा दिवस यासाठी निवडला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, भाजप शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, आमदार जगदीश मुळीक, सिद्धार्थ शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक सचिन दोडके, वसंत मोरे, अजय शिंदे, दत्तात्रय बहिरट हे गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, सकाळी 10 वाजताच कार्यकर्त्यांना नियोजितस्थळी जमण्याचे निरोप देण्यात आले आहेत. मिरवणुकीने अर्ज दाखल केले जाणार आहेत. कसबा गणपती मंदिरापासून मिरवणुकीने टिळक या अर्ज दाखल करण्यासाठी निघणार असून, कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने बागवे अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय अन्य उमेदवारही शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहेत.
युती आणि आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर आता काही पक्षांतील इच्छुकांनी बंड करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे हे उमेदवार गुरुवारी अर्ज दाखल करतात का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.