स्वीस अधिकाऱ्यांकडून नोटिफिकेशन जारी
नवी दिल्ली/ बेर्न- परदेशात जमा केल्या जाणाऱ्या काळ्या पैशाविरोधात भारत सरकारने कारवाईचा बडगा उगारताच “आयपीएल’चे माजी आयुक्त ललित मोदी आणि त्यांची पत्नी मिनल या दाम्पत्याच्या स्वीस बॅंकेच्या तपशिलाविषयी नोटीस बजावल्या आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या निवेदनानंतर स्वित्झर्लंडने मोदी दाम्पत्याला ही नोटीस बजावली आहे.
संशयास्पद आर्थिक अनियमिततेसंबंधीच्या यादीमध्ये ललित आणि मिनल मोदी (ऊर्फ मिनालिनी मोदी) यांचे नाव घेण्यात आले आहे. अशा आर्थिक अनियमितता असलेल्या व्यक्तींच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी करण्यात आलेल्या द्विपक्षीय करारांतर्गत ताज्या फेडरल गॅझेटमध्ये स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशनने या दाम्पत्याचे नाव दिले आहे.
ललित मोदी 2010 मध्ये लंडनला रवाना झाले आहेत. “आयपीएल’चे माजी आयुक्त ललित मोदी यांच्याविरोधात पैशाच्या अफरातफरीची चौकशी यापूर्वीच सुरू झाली आहे; परंतु आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे त्यांनी प्रथमपासून म्हटले आहे.
मोदी दाम्पत्याला भारतातील”एफटीए’च्या नोटिसीला उत्तर देण्यास प्रतिनिधी नियुक्त करायला केवळ 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मोदी दाम्पत्याविरोधात 1 ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या या अधिसूचनेमध्ये यापेक्षा अधिक कोणताही तपशील दिलेला नाही. मोदी दाम्पत्याविरोधात अशाच प्रकारची नोटीस 2016 मध्येही बजावण्यत आल्या होत्या. मात्र, त्याचे तपशील स्वीस अधिकाऱ्यांनी भारताला दिले होते की नाही, हे समजू शकलेले नाही. त्यावेळीही या दाम्पत्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली गेली होती.
अलीकडच्या काळात अन्य काही व्यक्तींच्या संदर्भात “स्वीस फॉरेन टॅक्स ऍथोरिटी’शी भारताच्या वतीने संपर्क साधला गेला होता. त्या व्यक्तींच्या विरोधात करचुकवेगिरीविषयी प्रलंबित असलेल्या तपासासंदर्भातील माहिती स्वीस अधिकाऱ्यांकडून मागवली गेली होती. स्वित्झर्लंडच्या कायद्यानुसार केलेल्या प्रक्रियेनंतर स्वित्झर्लंडने बऱ्याच घटनांमध्ये ही माहिती भारताला दिली आहे. यामध्ये “एचएसबीसी’च्या जीनिव्हा शाखेतील उघड झालेल्या यादीतील अनेक भारतीय खातेदारांचा समावेश आहे.
स्वित्झर्लंडच्या कायद्यानुसार कर विभागाकडून भारत किंवा अन्य देशाशी संबंधित नागरिकांच्या करविषयी माहितीची देवाण- घेवाण करण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया पाळली जाते. भारताबरोबरची ही प्रक्रिया 2018 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.