भरती प्रक्रियेत डावलल्याची चर्चा : आयुक्तांनी अद्याप स्वीकारला नाही
पिंपरी -महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील स्त्री रोग विभागातील एका डॉक्टरने शुक्रवारी (दि.13) तडकाफडकी राजीनामा दिला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपविला आहे. आयुक्तांनी तो अद्याप स्वीकारला नाही.
पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधित तीन रुग्ण आढळल्याने वैद्यकीय विभाग खडबडून जागा झाला आहे. शहरात अजूनही संशयित सापडत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच रुग्णालयांवर अतिरिक्त ताण आहे. त्यामध्येही शहरातील वायसीएम हे रुग्णालय सर्वात मोठे असल्याने या रुग्णालयावर करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी आहे. मात्र या रुग्णालयामध्ये मनुष्यबळ कमी असल्याची ओरड कायमच आहे. सातशे खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामध्ये राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी परिचारिका व तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी आहे.
त्यातच स्त्रीरोग विभागातील डॉ. प्रसाद भानप यांनी शुक्रवारी तडकाफडकी आपला राजीनामा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्याचे कारण जरी अद्याप गुलदस्त्यात असले तरी सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये डावलल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. वायसीएममध्ये अनेक डॉक्टर हे मानधनावर गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना शासनाच्या सरळसेवेचा कोणताही लाभ दिला जात नाही. महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच डॉक्टरांची कायमस्वरुपी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्या भरती प्रक्रियेत डॉ. प्रसाद भानप यांची निवड झालेली नाही. वायसीएम रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात ते काम करुनही त्यांना डावलल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरु आहे.