करोनाबाबत शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाइन सुरू

पिंपरी – करोनाचे शहरात नव्याने 7 संशयित रूग्ण आढळले आहेत. त्यानुसार संशयित रूग्णांची संख्या आता 48 वर पोहचली आहे. संबंधित व्यक्तींचे घशातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही (पुणे) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. करोनाने बाधित झालेल्या तीन रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. 4 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

41 व्यक्तींच्या घशातील द्रावाचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे. संबंधित व्यक्तींना “होम क्वारंटाईन’ अर्थात घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महापालिकेतर्फे सर्व खासगी वैद्यकिय व्यावसायिकांकडे परदेशातून आलेले नागरिक तपासणीसाठी आल्यास संबंधित नागरिकांची माहिती त्वरीत महापालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात (020-67331111/67331556) कळविण्यात यावी. तसेच, संबंधित नागरिकांना तपासणी अथवा आवश्‍यक सेवा लागल्यास महापालिकेच्या दवाखाना किंवा रूग्णालयात त्याबाबत कळविण्यात यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी
केले आहे.

नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, लहान बालके, गरोदर महिला आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा आदी आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व अभ्यासिका, सार्वजनिक वाचनालये, व्यायामशाळा, नाट्यगृह, सिनेमागृह, जलतरण तलाव, उद्यान, सायन्स पार्क 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत.

पालिकेकडून करोना आजाराबाबत नागरिकांना कोणतेही प्रश्‍न असतील तर त्यासाठी हेल्पलाइन (8888006666) सुरू केलेली आहे. हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.