पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना विषाणूचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दोन दिवसांत तब्बल 48 संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकामुळे शहरामध्ये करोना विषाणूचा फैलाव झाला आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांना तपासणी करून त्यांना “होम क्वारंटाईन’ म्हणजेच घरातच राहून दक्षता घेण्यासाठी घरकुल येथील रिकाम्या असलेल्या इमारतीमध्ये ठेवण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. मात्र यासाठी घरकुल येथे पाहणी करण्यासाठी गेलेल्या आयुक्तांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नागरिकांनी त्याठिकाणी संशयितांना ठेवण्यासाठी कडाडून विरोध केला आहे.
चिखली येथे घरकुल प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे 25 हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. तसेच यामधील 15 इमारती अद्याप रिकाम्या आहेत. या इमारतींमध्ये परदेशातून शहरात आलेल्या नागरिकांना ठेवण्यात येणार आहे. शहरात तीन करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण परदेशातून प्रवास करुन समोर आल्याचे आहे. त्यामुळे प्रवास करून आल्यानंतर तो व्यक्ती आठ दिवस ज्या नागरिकांच्या संपर्कात आला आहे, त्यांची कसून तपासणी करण्यात येणार आहे.
बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोध मोहीम सुरु आहे. करोना विषाणू हा बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने फैलावतो. त्यामुळे बाधित रुग्णांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांना वेगळे ठेवण्यासाठी स्वतंत्र जागेचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. दरम्यान घरकुल येथे पंधरा इमारती रिकाम्या असल्याने या ठिकाणी अशा नागरिकांना तपासणी करून ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे. तसेच सोसायट्या असल्याने येथे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ जास्त असणार आहे. घरकुलमध्ये अशा नागरिकांना ठेवल्याने करोना विषाणूचा प्रसार जास्त होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन तेथील नागरिकांनी याला कडाडून विरोध केला. पाहणीसाठी गेलेल्या आयुक्तांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत अधिकारी संजय भोसले व इतर कर्मचारी उपस्थित होते.
लोकवस्तीमध्ये ठेवून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार
घरकुलमध्ये सुमारे 25 हजार नागरिक वास्तव्यास आहे. येथील नागरिक कामानिमित्त रोज पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये ये-जा करत असतात. तसेच येथे कमी क्षेत्रफळामध्ये जास्त नागरिक राहत आहे. तसेच सोसायट्यामधील अंतर कमी आहे. त्यामुळे संसर्ग जलदगतीने होऊ शकतो. तसेच रहिवाशी भाग असल्याने येथे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ जास्त असते. अशा परिस्थितीमध्ये येथील नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे.
घरकुलमध्ये “होम क्वांरटाईन’ करण्यास आमचा विरोध आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक राहत आहेत. याठिकाणी संसर्ग झाला तर आटोक्यात आणणे कठीण होईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह मी लोकप्रतिनिधी म्हणून आयुक्तांना सांगितले आहे की घरकुलमध्ये संशयित रुग्णांना ठेवू नका.
– संजय नेवाळे, नगरसेवक.
शहरामध्ये अनेक रिकामी रुग्णालये आहेत. जी कोट्यवधी रुपये खर्च करून अद्याप सुरु केली नाहीत. शहरातील अनेक शाळा बंद आहेत. ज्या लोकवस्तीपासून दूर आहेत. ्अशा ठिकाणी अशा संशयितांना ठेवणे योग्य आहे. मात्र अशाप्रकारे लोकवस्तीमध्ये करोना विषाणूच्या संशयित नागरिकांना ठेवणे योग्य नाही. त्यामध्ये एखाद्याला संसर्ग झाला असेल तर संपूर्ण घरकुलमध्ये संसर्ग पसरू शकतो. त्याठिकाणी 25 हजार लोकसंख्या आहे. त्यांना संसर्ग झाला तर हाहाकार उडेल. प्रशासनाला विरोध करण्याचा आमचा हेतू नाही. करोना हे शहरावर आलेले संकट आहे. याची जाणीव आहे. मात्र त्यासाठी असे अघोरी प्रकार करणे योग्य नाही. संशयितांना लोकवस्तीपासून दूर ठेवले तरच हा आजार आटोक्यात आणणे शक्य होईल.
– सुधाकर धुरी, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ घरकुल.