पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम (यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय) मध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय होणार आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने एक एकर जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडे त्या बाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
तसेच म्हाडाच्या ताब्यात असणारी जागा देखीत ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालय तयार झाल्यास शहरातील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा प्राप्त होणार आहेत. तसेच अति दुर्धर आजारांवरील उपचाराची सोय देखील उपलब्ध होणार आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहरासह शहराबाहेरील देखील शेकडो गोर-गरीब रुग्ण उपचारासाठी रोज दाखल होतात. रुग्णालयात सध्या विविध आजारांवर उपचाराची सोय आहे. मात्र अति गंभीर आजारांच्या उपचारासाठी यंत्रणा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.. शहरातील रुग्णांची ही गैरसोय टाळण्यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
रुग्णालयाशेजारी एक एकर जागा आहे. या जागेवर सध्या बेघरांसाठी घरे असे आरक्षण पडले आहे. मात्र ही जागा ताब्यात आल्यास त्या ठिकाणी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाच्या नगरविकास विभागाकडे त्या बाबत प्रस्ताव पाठवून परवानगी मागण्यात आली.
सध्या या जागेपैकी सुमारे ९ गुंठे जागा म्हाडाच्या ताब्यात आहे. ती जागा ताब्यात घेण्याच्या सूचना नगरविकास विभागाने महापालिकेला दिल्या होत्या. महापालिका प्रशासनाने रितसर जागेचे पैसे भरून म्हाडाची जागा ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या बाबत पुन्हा नगरविकास विभागाला कळविले आहे. आता नगरविकास विभागाकडून परवागनी आल्यानंतर जागा ताब्यात घेऊन सुपर स्पेशालिटी रुग्णालय साकारणार आहे.
या रुग्णाललामध्ये हृदयाशी संबंधित आजारांवरील विभाग, प्लॅस्टिक सर्जरी, बर्न (जळित) वाॅर्ड आदीसह अति गंभीर आजारांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वायसीएम रुग्णालयाशेजारी असणारी एक एकर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. सध्याचे आरक्षण हटवून तसेच म्हाडाच्या ताब्यातील जमीन घेऊन त्या ठिकाणी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी कार्डियाक, बर्न वाॅर्ड, प्लॅस्टिक सर्जरी आदीसह विविध उपचार होणार आहे. – डाॅ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, पीजी महाविद्यालय. वायसीएम.