नंदुरबार – नंदुरबारमधून भाजपने सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या डॉक्टर हिना गावित यांचीच उमेदवारी कायम ठेवली आहे. दुसरीकडे काँग्रेसने त्यांच्या विरोधात अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवले आहे.
त्यामुळे नंदुरबार मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा डॉक्टर विरुद्ध वकील अशी लढत पाहायला मिळणार आहे. गेल्यावेळी के.सी.पाडवी आणि हिना गावित यांच्यात लढत रंगलेली पाहायला मिळाली होती.
काँग्रेसचा एकछत्री अंमल असलेला पण मोदी लाटेत भाजपच्या ताब्यात गेलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार मतदारसंघ. 60 वर्ष काँग्रेसचे वर्चस्व राहिलेला हा मतदारसंघ गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे.
हातून निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने भाजपच्या हिना गावित यांच्या विरोधात के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवले आहे. आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघामध्ये दोन उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.
नंदुरबार हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. काँग्रेसच्या दृष्टिने हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असून गांधी कुटुंबाचे विशेष प्रेम या मतदारसंघावर असल्याचे पाहायला मिळाले आहे.
त्यामुळे पुन्हा मतदारसंघावर असलले काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. मविआ आणि महायुतीतील अंतर्गत धुसफूसही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.