दिवसभर फक्त भाजप उमेदवारांचीच चर्चा

सस्पेन्स अखेर संपला : शिवाजीनगर, कोथरुड, कॅन्टोमेंट मतदार संघात खांदेपालट


कसब्यातून महापौर मुक्‍ता टिळक यांना उमेदवारी


शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघही नाही

पुणे – किती मतदार संघ शिवसेनेला सोडणार, रिपाइंला एखादा तरी मतदार संघ देणार का? विद्यमान काही आमदारांची तिकिटे कापली जाणार का? अशा चर्चांना पूर्णविराम देत मध्यरात्रीच्या सुमारास भाजपच्या अंतर्गत गोट्यातून पुण्यातील उमेदवार जाहीर झाल्याचे सांगण्यात आले आणि सस्पेन्स अखेर संपला. यामध्ये शिवाजीनगर, कोथरुड, कॅन्टोमेंट मतदार संघातील विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली असून ज्येष्ठ नेते चंद्रकात पाटील, पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना भाजपने तिकीट दिले आहे. याशिवाय अन्य मतदारसंघांतून विद्यमान आमदारांना तिकीटे देण्यात आली आहेत. कसब्यातून मात्र महापौर मुक्ता टिळक यांना तिकीट दिले आहे.

भाजपने अधिकृतरित्या ही घोषणा केली नसली, तरी उमेदवारांना निरोप पोहचविण्यात आले आहेत. शिवसेनेला एकही मतदार संघ दिला नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त करण्यास सुरुवात केली आहे. भाजप-शिवसेनेचा हक्काचा गड कोथरुडमध्ये बाहेरील उमेदवाराला तिकिट दिल्याने उघड नाराजी व्यक्‍त होत आहे. भाजप इच्छुकांमध्ये सर्वाधिक संख्या ही शिवाजीनगरमधून होती. यात अखेर शिरोळे वरचढ ठरले. सिद्धार्थ हे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे खासदारकीचे तिकीट नाकारण्यात आले, त्याचवेळी मुलाला शिवाजीनगरची उमेदवारी देण्यासाठीच शिरोळे यांनी त्याग केल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, हडपसर शिवसेनेला सोडण्याची चर्चा होती. त्याला पूर्णविराम मिळाला आहे.

बापट यांच्यामुळे रिक्त झालेल्या कसबा मतदार संघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली आहे. येथून इच्छुकांची संख्या जास्त होती. यात टिळक यांनी बाजी मारली आहे. बापट यांनी गेले पाच टर्म या मतदारसंघातून विजयाची कमान राखली आहे. त्यामुळे जो उमेदवार देण्यात येणार आहे, तो त्यांच्या मर्जीतील असणार हे निश्‍चित होते, अशी चर्चा आहे.

सध्या तरी भाजपाने पुणे शहरातील सर्व उमेदवार जाहीर करुन पत्ते उघडलेले आहेत. आता विरोधी पक्षाकडून कोणते उमेदवार रिंगणात उतरणार आहेत, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मंगळवार सायंकाळपर्यंत उमेदवार जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

मतदारसंघ आणि उमेदवार
वडगाव शेरी- जगदीश मुळीक (विद्यमान आमदार)
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
कोथरूड- चंद्रकांत पाटील
पर्वती- माधुरी मिसाळ (विद्यमान आमदार)
पुणे कॅन्टोन्मेंट – सुनील कांबळे
कसबा पेठ- मुक्‍ता टिळक
हडपसर- योगेश टिळेकर (विद्यमान आमदार)
खडकवासला- भीमराव तापकीर (विद्यमान आमदार)

Leave A Reply

Your email address will not be published.