सांगवी – निवडलेला घाटांचा रस्ता, कडकडीत गारठा, तापमान 5 ते 19 अंश सेल्सिअस, शेवटचे दोन तास लागलेला पाऊस यावर मात करत ब्रिटिश व जर्मन सहकाऱ्यांसोबत अवघ्या 24 तासांत सायकलवरून लंडन ते पॅरीस 330 किलोमीटर अंतर पार करण्याची किमया नवी सांगवीतील संजय शितोळे देशमुख यांनी केली.
30 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता लंडनमधील टॉवर ब्रिजपासून सुरू केलेले सायकलिंग दुसऱ्या दिवशी 1 मे रोजी आयफेल टॉवर येथे 2.30 वाजता संपले. याबाबत बोलताना शितोळे यांनी सांगितले की, लंडन ते ग्रीनविच, केंट, शडाऊन फॉरेस्ट, ससेक्स काऊंटीतील मधील या चढ-उताराच्या रमणीय रस्त्याने घाम काढला. इंग्लिश चॅनेल न्यूहेवन येथून फेरी बोटीने पार करायला 5 तास लागले. फ्रान्समधील डीपी बंदरावर इंग्रजी न कळणाऱ्या फ्रेंच इमिग्रेशन ऑफीसरबरोबर वादावादीने 30 मिनिटे वाया गेली. पुढील प्रवास सोमे व्हॅली, नॉर्मडी या महायुद्धातील अनेक थरारक प्रसंगातील साक्षीदार असलेल्या निसर्गरम्य भूमीतून होता. पण वेळेचे बंधन व चढ-उताराने कस लागला. पॅरीसच्या उपनगरातून आयफेल टॉवरचे टोक पाहिल्यावर 1940 मध्ये फ्रान्स जिंकणाऱ्या जर्मन सैन्याला झाला नसेल, एवढा आनंद झाला.
शिल्लक 45 मिनिटे वेळ व जीपीएस दहा किमी अंतर दाखवत होते. पाऊस जोरदार पडत होता. शरीराने साथ सोडली असताना प्रयत्नपूर्वक मन व श्वासाची लय जोडली गेली व आयफेल टॉवर मोठमोठा होत गेला. पाऊस थांबत आला होता, पण डोळ्यांतून अश्रूधारा बरसत होत्या.
संजय शितोळे देशमुख हे लंडनमधील अनेक संस्थांशी संबंधित आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील व युरोपमधील सर्वोच्च शिखरे पार केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सायकल मोहिमा केल्या आहेत. याचबरोबर ते गेल्या 27 वर्षांपासून अय्यंगार योगाचे अभ्यासक आहेत. या कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवडमधून शितोळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
युरोप मध्ये पर्यटन करणे हे भारतीयांसाठी नेहमीच कुतूहल असते. शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी योग हा परिपूर्ण व्यायाम आहे. मी प्रशांत अय्यंगार यांचे योग संस्कार केले. यात प्रो-सायकलचे प्रसाद शाळीग्राम यांनी माझ्या स्कॉट सायकलची व्यवस्था करून प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी ही कामगिरी पार पाडू शकलो.
– संजय शितोळे-देशमुख,