रुद्रप्रयाग (उत्तराखंड) – देशातील सर्वात जुने आणि सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाणाऱ्या केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले.हिवाळा सुरू झाल्यानंतर या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी सहा महिने बंद असतात. आज या दरवाजे उघडण्याच्या सोहळ्यासाठी जमलेल्या भक्तांच्या गर्दीतून ‘हर हर महादेव’ चा जयघोष सुरू झाला.आणि भाविकांनी तेथे दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
या निमीत्त भगवान शिवाचे निवासस्थान ४० क्विंटल फुलांच्या पाकळ्यांनी सजवले गेले होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्यांच्या पत्नी गीता धामी बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी उपस्थित होते, मंदिराचे दरवाजे श्लोक आणि मंत्रोच्चारात उघडण्यात आले. चार धाम यात्रेतील केदारनाथ मंदिराच्या बरोबरच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्रीचेही दरवाजे उघडण्यात आले. बद्रीनाथ धामचे दरवाजे १२ मे रोजी उघडले जातील.