पिंपळे गुरव – पिंपरी चिंचवड महापालिकेने इंदौरच्या धर्तीवर कचराकुंडीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. मात्र, हे करताना शहर परिसरातील कचराकुंड्या काढून टाकल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक, नोकरदार, आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना घंटागाडीच्या वेळेत पोहचता येत नाही. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. स्मार्ट सिटी सारख्या परिसरात कचराकुंडीमुक्ती प्रभाग ही संकल्पना कागदावरच राहत आहे. एकंदरीतच शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनताना दिसून येत आहे.
पिंपळे गुरव येथील गजानन नगर रोड नंबर 3 मधील अंतर्गत रस्त्यावर मोकळ्या जागेतील परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. तसेच साठ फुटी रोडच्या कडेला आणि दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर विजय नगर परिसरात देखील कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. नागरिक सकाळी कामाला जाताना किंवा कामावरून आल्यानंतर कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडतात. पण कचराकुंडीच नसल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत कचरा टाकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात रस्त्यांच्या कडेला कचरा टाकला जात असल्याने भटकी कुत्री व मोकाट जनावरे यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना कुत्री आणि जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वेळा मोकाट कुत्री दुचाकी आणि नागरिकांच्या मागे धावत आहेत. त्यामुळे अपघात अथवा कुत्रे नागरिकांना चावा घेत आहेत.
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
एकीकडे महापालिकेचे आरोग्य विभाग स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध उपक्रम राबविते. शहर परिसरात जनजागृती करते. मात्र शहरातील बहुतांश सर्वच रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग आणि कचरा अस्ताव्यस्त पद्धतीने पडलेला दिसून येत आहे. परंतु महापालिकेचा आरोग्य विभाग उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करताना दिसून येत नाही. काही भागात दररोज कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कचरा टाकणारांवर कारवाईची मागणी होत आहे.
ती मोकळी जागा नसून खासगी जागा आहे. सदर खासगी मालकाचा शोध घेऊन आरोग्य विभागाकडून नोटीस दिली जाणार आहे. नियमानुसार खासगी जागेतील स्वच्छता आरोग्य विभाग करीत नाही. तरी देखील मी मदत करता येईल तेवढी करेन. येत्या दोन तीन दिवसांत पाहणी करून कारवाई करण्यात येईल.
– धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक.
गजानन नगर रोडवरील मोकळ्या जागेत नागरिक कचरा टाकत आहेत. पाऊस पडल्यामुळे कचरा, पालापाचुळा याची दुर्गंधी सुटली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला येथील कचरा साफ करण्याची वारंवार मागणी केली आहे. परंतु दुर्लक्ष करण्यात येत आहे.
– डॉ. पांडुरंग बुरुटे, स्थानिक नागरिक.