कॉंग्रेस कार्यकर्त्यांना धक्‍का लावाल तर, खबरदार…

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपला इशारा

पुणे – युती सरकारच्या काळात भाजप प्रशासनाच्या माध्यमातून सतत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आला आहे. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला दिला.

चव्हाण यांची मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना चव्हाण बोलत होते. यावेळी, शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे, दीप्ती चवधरी, दत्तात्रेय बहिरट, संजय बालगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, “राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार आहे. या सरकारमध्ये कॉंग्रेस पक्ष सहभागी झाल्याने सरकार स्थापन करता आले. त्यामुळे तिन्ही पक्षांनी समन्वयाने सरकार चालवणे आवश्‍यक आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्ष वाढवणार असून कार्यकर्त्याला पाठबळ देण्यात येणार आहे. तसेच, भाजप सरकार महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, विकासाच्या माध्यमातून तिन्ही पक्षांचे सरकार टिकणार असल्याचे सांगत चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली.

खरं काम करणाऱ्या लोकांची नावे पुढे करा
रमेश बागवे यांनी भाषणात पडझडीच्या काळात कॉंग्रेस पक्षाला साथ देणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली. यावर चव्हाण म्हणाले, “पुढील दीड ते दोन वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. यात पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली जाणार आहे. मात्र, पक्षाचे खरे काम करणाऱ्या लोकांची नावे पुढे करा,’ अशी कोपरखळी चव्हाण यांनी शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना मारली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.