प्रस्तावित कचरा वर्गीकरण प्रकल्पास विरोध

वाघोलीमध्ये प्रकल्पाविरोधात संतप्त नागरिक एकवटले : प्रशासनाला निवेदन

वाघोली- पुणे -नगर महामार्गाजवळ रिलायन्स मार्ट समोर गट नंबर 1326 मध्ये 50 गुंठे क्षेत्रात प्रस्तावित कचरा वर्गीकरण प्रकल्पास मान्यता देऊ नये अशी आक्रमक भूमिका वाघोली परिसरातील नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रकल्प राबवू नये, यासाठी 80 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, जिल्हा परिषदेला दिले आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता अंधातरी लटकल्याचे समोर आले आहे.

वाघोली गावातील गट नंबर 1362 मध्ये 50 आर क्षेत्रात कचरा प्रक्रिया वर्गीकरण प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होणार आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना विविध आजार बळावू शकतात. कचरा वर्गीकरण प्रकल्प वॉर्ड क्रमांक 1 व 2 मधील जे गृहप्रकल्प आहेत. त्यामधील ऍमेनिटी स्पेसमध्ये करण्यात यावा. त्याचप्रमाणे या गट नंबर शेजारी एअर फोर्सचा एरिया आहे. एअर फोर्स अधिकारी यांनी याच वॉर्डमधील साई सत्यम पार्क या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी टाकीचे बांधकाम 70 टक्‍के पूर्ण होऊनही एअर फोर्स यांनी थांबविले आहे.

त्यामधील खर्च केलेला ग्रामपंचायत निधी हा वाया गेलेला आहे. त्यामुळे या जागेत कचरा प्रकल्प केल्यास आणि निधीचा खर्च केल्यास एअर फोर्सची अडचण येऊ शकेल. या प्रकल्पामुळे पक्षी, गिधाडे यांचा वावर सुरू झाल्यास प्रकल्प एअर फोर्स बंद करू शकते. त्यामुळे याचा विचार संबंधित प्रशासनाने करण्याची गरज आहे. जिल्ह्यात नावारुपास आलेल्या वाघोली येथील वॉर्ड क्रमांक 1 व 2 मधील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्‍तींनी नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी तातडीने शासनदरबारी पाठपुरावा करणे करून पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्‍त होत आहे.

कायमस्वरूपी प्रयत्न गरजेचे
वाघोलीमध्ये कचऱ्याची आणि सांडपाण्याची समस्या गंभीर आहे. ती सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. वॉर्ड क्रमांक एक आणि दोनमध्ये कचरा आणि सांडपाण्याची समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जागेची उपलब्धता आणि निधीची कमतरता पडू नये, ही नागरिकांकडून अपेक्षा वारंवार व्यक्‍त केली जात आहे.

आमच्या हद्दीत तुमचा कचरा नको
पुणे शहरातील कचरा टाकण्यासाठी वाघोलीच्या जागेवर महापालिका प्रशासनाचा डोळा आहे. ज्या ठिंकाणी कचरा टाकण्याचे नियोजन केले जाते. त्यावेळी तेथील नागरिकांचा विरोध वाढत आहे. त्यामुळे पुणे शहरातील कचरा आमच्या माथी का मारला जातो, असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्‍त केला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत कचरा प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच धुपत आहे. वाघोलीतीलच कचरा प्रकल्प स्थानिक नागरिकांसाठीच व्हावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील कचरा नको, अशी भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये, अशा जागेचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.