Congress Criticism Smriti Irani : जागतिक उपासमार निर्देशांकमध्ये (Global Hunger Index 2023 )देशाची झालेली घसरण सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. १२५ देशांच्या या यादीत भारताचे स्थान १११वं आहे. गेल्या वर्षी भारत यादीत १०७व्या स्थानावर होता. या वर्षी त्यातही घसरण होत १११ व्या स्थानी भारताची घसरण झाली आहे. त्यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. आता स्मृती इराणी यांनी यासंदर्भात केलेल्या एका विधानावर काँग्रेसकडून तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. जागतिक उपासमार निर्देशांकाबाबत स्मृती इराणी यांनी या कार्यक्रमात हास्यास्पद विधान केले आहे. “काही निर्देशांक जाणून बुजून भारतातील खरी परिस्थिती दाखवत नाहीत. उदाहरणार्थ, जागतिक उपासमार निर्देशांक. अनेक लोक म्हणतात हे फसवे आहेत. हे लोक भारतात १४० कोटींच्या लोकसंख्येपैकी ३ हजार लोकांना फोन करून विचारतात की तुम्ही उपाशी आहात का? त्यावरून ते हे निर्देशांक बनवतात”, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
Ms @smritiirani ,
I don’t know what’s more shameful – your level of ignorance or your insensitivity at display here?
Do you honestly think Global Hunger Index is calculated by calling up people and asking them if they are hungry!!???
You are the Women and Child Development… pic.twitter.com/pTnHsNDEo3
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) October 20, 2023
दरम्यान, स्मृती इराणी यांच्या याच वक्तव्यावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनते यांनी टीका केली आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “मला हे कळत नाहीये की जास्त लाजिरवाणं काय आहे. तुमच्या दुर्लक्षाची पातळी की असंवेदनशीलतेची पातळी? तुम्हाला खरंच असं वाटतं की ग्लोबल हंगर इंडेक्स फक्त लोकांना फोन करून ते उपाशी आहेत का? हा प्रश्न विचारून तयार केला जातो? तुम्ही देशाच्या मंत्री आहात. तुमच्याकडून हे ऐकणं दुर्दैवी आहे”, असे सुप्रिया श्रीनते यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.
“चार महत्त्वाच्या निकषांवर आधारित माहितीच्या आधारे ही यादी तयार केली जाते. कृपया उपासमारीची चेष्टा करू नका. तुम्ही एक शक्तीशाली महिला आहात. केंद्रात मंत्री आहात. तुमच्यासाठी विमानात व तुम्ही जिथे जाता तिथे पुरेसं, किंबहुना जास्तच अन्न उपलब्ध आहे”, असेही सुप्रिया श्रीनते यांनी म्हटले आहे.