पुणे – राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत बूट व मोजे वाटप करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पाठय़पुस्तके यांचे मोफत वाटप करण्यात येते. मात्र बुट व पायमोजे वाटप करण्यास हिवाळा उजाडतो. यंदा हा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनाने सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे याकरिता प्रति लाभार्थी विद्यार्थी १७० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार बुट व पायमोजे यांचा लाभ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.