फुरसुंगी – पूर्व हवेली तालुक्यावर सध्या भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यातच पालिकेत समाविष्ट गावांना केला जाणारा पाणीपुरवठा अपुरा व अनियमित असल्याने हांडेवाडी परीसर, होळकरवाडी, औताडेवाडी भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेत हांडेवाडी गावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी मागेल त्याला मोफत पाणी टॅंकर योजना सुरू केली आहे.
यावेळी हांडेवाडीगावचे ज्ञानेश्वर भजनी मंडळांचे अध्यक्ष हभप सुनिल हांडे महाराज यांच्या हस्ते मागेल त्याला मोफत पाणी टॅंकर योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याबाबत सरपंच संजय जाधव म्हणाले की, पाणी हे जीवन आहे. पुरेसा पाणी पुरवठा करण्याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा केला असता प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्याने पुढाकार घेत सदर योजन सुरू केली आहे.
जो पर्यंत दुष्काळी स्थिती आहे तोपर्यंत मोफत पाणी वाटपाची सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. जुनमध्ये पाऊस पडल्यानंतरच योजना बंद होईल, असे जाधव यांनी सांगितले. सरपंच जाधव यांच्या या उपक्रमाबाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी बाळा गुलाब हांडे, सोमनाथ हांडे, कताराम जाधव, दिलीप जगताप, काळुराम हांडे, महेंद्र हांडे, बाळराजे हांडे, कैलास हांडे, शरद हांडे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.