पुणे – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशवासियांना हमी देण्यासाठी तयार केलेल्या न्याय पत्रातील (जाहीरनामा) तरतुदींची माहिती देण्यासाठी तयार केलेले गॅरंटी कार्ड पुणे लोकसभा मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
या कामासाठी सर्व घटकपक्षांच्या कायर्र्कर्त्यांच्या बुथनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून मतदार संघातील दोन हजार बुथवर एकाच वेळी गॅरंटी कार्ड पाठवण्याची मोहीम शनिवारपासून (२७ एप्रिल) हाती घेण्यात येणार आहे. या गॅरंटी कार्डच्या खाली असलेल्या स्लिपवर मतदाराचे नाव व इतर माहिती भरून घेवून त्या स्लिप संकलीत केल्या जाणार आहेत. हे काम आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.
या शिवाय मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात सहा विजयी रथ फिरणार आहेत. या रथामधून एलईडीद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भाषणे, काँग्रेसचे गॅरंटी कार्ड प्रदर्शित करण्यात येणार आहेत.