विविध बाबींचा आढावा : “करोना’बाबतच्या कामगिरीवर समाधान
पिंपरी – “करोना’ प्रतिबंधासाठी महापालिकेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापर सर्वांनी करावा. महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास साथ आटोक्यात आणता येईल, असे मत केंद्र शासनाच्या पथकाचे प्रमुख व अतिरिक्त सचिव संजय मलहोत्रा यांनी व्यक्त केले. केंद्रीय पथकाने शहराची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केले.
महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणासाठी केंद्रशासनाचे पथकाने पालिका क्षेत्रात पाहणी केली. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना पालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
या पथकांमध्ये अतिरिक्त महासंचालक डॉ पी के सेन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे सहसल्लागार डॉ. पवनकुमार सिंग, अतिरिक्त वरिष्ठ सहायक डॉ अरविंद अलोने अन्न व वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग यांचा समावेश होता. या पथकाने आकुर्डी येथील उर्दू माध्यमिक विद्यालय येथे असलेल्या परराज्यातील नागरिकांसाठीच्या निवाराकेंद्राला भेट देऊन माहिती घेतली.
तेथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर चिंचवड येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट दिली. तसेच खराळवाडी येथील कंटेनमेंट झोनची पाहणी केली. तिथे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. त्यानंतर नेहरूनगर येथील पॉलीग्रास हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या तात्पुरत्या भाजी मंडईची पाहणीही केली. तिथे राबविण्यात येत असलेल्या सोशल डिस्टंसिंग व स्वच्छतेबाबतची माहिती घेतली. तसेच उत्कृष्ट भाजी मंडईचे नियोजन केल्याने इतर ठिकाणीही त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचनाही या पथकाने दिल्या.
महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या वॉर रूमची पाहणीही या पथकाने केली. या पथकाने या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर इंद्रायणीनगर येथील केंद्राची पाहणी केली. मोशी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरची पाहणी केली.